कु हा स्वतःला नेहमीच प्रथम जर्मन आणि नंतर ज्यू समजत असे. त्याला जर्मनीचा विलक्षण अभिमान होता; पण नोव्हेंबर 1938मध्ये त्याला झोडपलं गेलं, त्याला अटक करून छळछावणीत त्याची रवानगी झाली आणि त्याला जर्मनीचा वाटणारा अभिमान हा भूतकाळ झाला. त्याच्या पुढच्या सात वर्षांत, कल्पना करता येणार नाही असे भयकारी प्रसंग त्याच्यावर ओढवले; प्रथम बुखेनवाल्डमध्ये आणि नंतर आउश्वित्झमध्ये मृत्युयात्रेची वाट चालत असताना तो आपल्या कुटुंबाला मुकला, त्याचे मित्र त्याने गमावले आणि अखेर त्याचा देशही त्याचा उरला नाही. प्रसंगी हृदय विदीर्ण करणारी, तरीही अत्यंत समर्थ आणि आशादायक अशी ही स्मृतिकहाणी आहे. 'भोवती अथांग काळोख दाटला असला तरी आनंद शोधता आणि मिळवता येतो' हाच या प्रेरणादायी जीवनकथेचा संदेश आहे.